कालची आत्महत्या…
आम्ही इतके कसे बेईमान झालोत ?


आवाज माझा
संपादकीय : राजू निमसटकर

शंभर एकराचे वर जमिनीचा मालक असलेल्या शेतकऱ्याने, ज्यांनी ‘भूदान’ चळवळ चालवली त्या विनोबांच्या पवनार आश्रमात जाऊन, अन्नात विष कालवून स्वतःसह पत्नी व चार मुलांचे जीव ‘दान’ करून टाकले. त्या राज्यांतल्या पहिल्या सामूहिक आत्महत्येला काल ३७ वर्षे पूर्ण झालीत. जगाचा पोशिंदा कालही मेला आजही मरतो आहे. तरीही आम्हाला काहीच कसे का वाटत नाही. आम्ही इतके कसे बेहमान झालोत ? हा प्रश्न स्वतःला विचारल्यावाचुन राहावला नाही. आणी म्हणूनच…

बरोबर १९ मार्च १९८६ या दिवशी ज्या माणसाने एकट्याने नव्हे तर सबंध कुटुंबांसहित आत्महत्या केली, ते साहेबराव शेषराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावचे मूळ रहिवासी होते. जगण्याची उमेद हरवीलेल्या साहेबरावांनी पत्नी मालती व चार मुलींना घेऊन, पवनार आश्रमात जेवणात विष कालवून आत्महत्त्या केली होती. त्यावेळी चौथी मुलगी तर केवळ आठ महिन्याचीच होती. आता ‘शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे’ असे मृत्यपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात साहेबरावांनी दुःखाची कैफियत नमूद केली होती. हेच ते दुःखाची कैफियत मांडणार पत्र ३७ वर्ष पूर्ण होऊनही आजही कृषीप्रधान देशासह पांढरपेशा व्यवस्थेसकट सर्वांना वाकुल्या दाखवतेयं.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा परिपाकच म्हणावा की काय, मागच्याची री पुढच्याने ओढली. सरकारे आली आणि गेलीत, कधी कर्जमाफी झाली. तर कधी पॅकेजेस दिल्या गेलीत. परंतु वाढलेली महागाई, त्यातुलनेत शेतमालाचे कोसळलेले भाव, सिंचनाचा अभाव, सावकारी कर्जाचा डोंगर, कर्जाच्या परतफेडीसाठीचा तगादा, बदलते हवामान, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, अशा प्रमुख कारणांमुळे अजूनही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत.आत्महत्येचं हे दृष्टचक्र आजही कायम चालू आहे. साहेबराव करपेच्या आत्महत्ये पूर्वी नोंदल्या न गेलेल्या आत्महत्यांचा आकडा कदाचित लाख, कोटीत असेल. त्यांच्या मरण्यामागची कारणेही कदाचित हीच किंवा अशीच असणार. मात्र साहेबराव करपेंच्या कुटुंबाचं मरणं ‘एका शेतकरी कुटुंबाची सामुहीक आत्महत्या’ म्हणून नोंदलं गेलं. जगण्याचा मुख्य आधार असलेल्या या कृषिप्रधान प्रदेशात अधिकृतपणे नोंदली गेलेली ती पहिलीच ‘शेतकरी आत्महत्या’ नोंद झाली. आणि त्यानंतर मागची सलग सदतीस वर्षे या नोंदी होत आहेत, लागोपाठ होत आहेत. शेतकरी म्हणून जगणे इतके कठीण झाले आहे का. शेतकरी आत्महत्येच हे भयान वास्तव, जगण्यातली विदारकता निष्ठूर मनाच्या कुठल्याही माणसाला पाझंर फोडल्याशिवाय का राहत नाही. आम्ही इतके कसे बेहमान झालोत ? हा प्रश्न स्वतःला विचारल्यावाचुन राहावला नाही…

मग शेतक-यांची वा शेतीची परिस्थिती सुधारावी यासाठी काही प्रयत्न झाले का ? याचा मागोवा घेतला तर हाती काहीही लागत नाही. एका दाण्याचे हजार दाणे करणारा, पिढ्यानपिढ्यांचा अन्नदाता काही हजारांचं कर्ज फेडता येत नाही म्हणून जीव देतो आणि मग दोन चार पुढाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार स्तरावरचा अधिकारी जाऊन हजार चौकशा करून झाल्यावर त्या जीवाचं मोल, लाख रुपयांच्या चेकने करतो. ही काय त्या मरणाची किंमत असते का ? त्या छटाकभर पैशाने घरचा धनी, मेलेला जीव, कोवळ्या पोरांच्या मस्तकावरचं हरवलेलं बापाचं छत्र पुन्हा सावली धरणार आहे का, जगाचा पोशिंदा बळीराजा पुन्हा वापस येणार आहे का? मग तो जाऊच नये यासाठीच्या सरकारच्या स्तरावर काही ठोस उपाययोजना आम्ही का करू शकत नाही आहोत. आम्ही पांढरपेशा व्यवस्थेतले लोक या व्यवस्थेसकट इतके कसे गुलाम झालो आहोत ? हा प्रश्न स्वतःला विचारल्यावाचुन राहावला नाही…

दोन-चार वर्ग शिकलोत, जगण्यातली अक्कल हुशारी आली म्हणून काय, ज्या शेतमातीत आपल्या पिढ्यानपिढ्या खपल्यात, जीच्या अन्नाच्या भरोशावर पिढ्यानपिढ्या जगल्यात. त्याच शेतकऱ्याचे पुत्र वा सन्मानाने आम्ही भूमिपुत्र म्हणवून घेतो. मग कुणालाच कशा काय यातल्या वेदना भिडत नाही. इतके आम्ही कसे काय पांढरपेशी व्यवस्थेत लाचार झालो आहोत ? अरे ज्या भूमीत जन्मलोय, ज्या भूमीत राबलोयं, जिथे रक्ताचे पाणी करत जिच्या भरोशावर आजपर्यंत जगलोय. त्याच भूमीत त्याच्या वेदना समजून घेणारा कोणी नाही. अस ज्या मायबाप बळीराजाच्या मनात येतं, त्याचं जगणं किती भयान असतं याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही. की मग बळीराजांने केलेली आत्महत्या ही आत्महत्या नसून पांढरपेशा व्यवस्थेने बळीराजाचा घेतलेला बळी आहे. असे समजत बळीराजाच्या बळी वंशाच्या आत्मघाती परंपरेचे आपणही पुरस्कर्ते ठरणार आहोत का ? हा प्रश्न स्वतःला विचारल्या वाचुन राहावला नाही…

शेतीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करीत, शेती आधुनिकतेकडे वळविली पाहिजे असे काही मेक इन इंडिया, कॅशलेस इंडिया वगैरे बिनबुडाच्या भानगडी अभिमानाने सांगणा-या शासनव्यवस्थेला कधीच का वाटत नाही. सिंचनातल्या भ्रष्टाचारामुळे पाण्याचे योग्य नियोजन नाही. कोरडवाहू असलेला अल्पभूधारक शेतकरी अधिक मोठ्या प्रमाणात दारिद्र्य रेषे खालचं जीवन जगतोय. ना त्यांना बँक जवळ घेत ना शासन स्तरावरून त्यांच्यासाठी धोरणात्मक पाऊले उचलली जात. बियाणं, खतं, कीटकनाशकांसाठी अव्वाच्या सव्वा खर्च करावा लागतो. त्यासाठी सावकारांच्या दाराची उंबरठे झिजवावी लागतात.सोबत संसाराचा पसारा आहेच. हे सर्व करून जेव्हा, बळीराजा सततच्या नापीकिला सामोरा जातो आणि भस्मासुरासारखी लचके तोडणारी माणसे जेव्हा त्याचे दारात मागणं मागायला उभी राहतात. तेव्हा अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाला दिसतोय तो गोठ्यातला कासरा अन शिल्लक राहिलेलं विषारी कीटकनाशक. कशी अवस्था होत असेल, मायबाप बळीराजाची त्यावेळी. आणि आपण मात्र आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली असं मुर्दाड मनानं बोलत राहतो. काय मोल करते ही व्यवस्था एखाद्याच्या जगण्या-मरण्याची, कारण आपल्याकडचं कुणी गेलेल नसतं ना. इतके कसे आपण माणूसघाण झालो आहोत ? म्हणूनच हा प्रश्न विचारल्या वाचून राहावला नाही.


बस इतकच, मात्र जाता जाता एवढेच म्हणेन. आम्ही कृषी प्रधान देशाची लेकरे आहोत. आम्ही अन्नदात्या जगाचा पोशिंदा बळीराजाची लेकरं आहोत. असे आपण जर स्वाभिमानाने म्हणत असू तर, थोडीशी असू द्या. या ना त्या मागणीसाठी आपण जोरजोराने आंदोलने करतो. शासन प्रशासनासह सरकारसकट आपल्या स्वार्थ मागण्यांसाठी सर्वसामान्य जनतेला देखील वेठीस धरतो. मग बरोबर १९ मार्च १९८६ या दिवशी म्हणजेच बरोबर ३७ वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबासह जीवनाचा शेवट करणाऱ्या आपलाच वंशज असलेल्या बळीराजा साहेबराव करपेंच्या स्मृतिदिनी सुरू झालेल्या ” एक दिवशीय अन्नत्याग आंदोलनाचा ” आपल्याला खरेच विसर पडला. की मग आपण हे सर्व जानतेपणाने करता आहात. एवढे आपण कृतघ्न,नतद्रष्ट, बेईमान, लाचार कसे झालोत ? म्हणूनच हा प्रश्न विचारल्या वाचून राहावला नाही…
संपादक
आवाज माझा : राजू निमसटकर


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment