वणी – राजू निमसटकर
आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुद्धा मागे नाही. अशातच दिनांक १४ ऑगस्ट रोजी भारतीय निवडणुक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले. त्यामध्ये “वंचित बहुजन आघाडीला” विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात “गॅस सिलेंडर” चिन्ह दिल्याचे घोषित केले आहे.
२५ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरा केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी केल्याचे दिसले. यातच राज्यातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीसाठी ही खूप चांगली संधी मानली जात आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या सर्वच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी कपबशी, तर काही ठिकाणी गॅस सिलेंडर अशा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर चिन्ह मिळाले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी एका पत्रकाद्वारे कळविली आहे.