खळबळजनक :रेती माफियांच्या धमकीविरुद्ध पत्रकार सचिन मेश्राम यांचे आमरण उपोषण सुरू.वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा…!


मारेगाव (प्रतिनिधी) :
मारेगांव तालुक्याचे आपटी रेती घाटावरील अवैध उपशाचे वास्तव उघड करणाऱ्या ‘मारेगाव वार्ता’ चे संपादक सचिन मेश्राम यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या माफियाराज आणि प्रशासकीय दिरंगाईविरुद्ध सचिन मेश्राम यांनी तहसील कार्यालयासमोर ‘बेमुदत आमरण उपोषण’ सुरू केले आहे. विशेष म्हणजे, या लढ्याला आता राजकीय पाठबळ मिळत असून, वंचित बहुजन आघाडीने या आंदोलनात उडी घेत महसूल प्रशासनाला धारेवर धरले आहे.

२४ एप्रिल पासून सुरुवात झालेल्या आंदोलन स्थळी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वैरागडे यांच्या हस्ते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लोकशाहीच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आणि पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी हा लढा निर्णायक असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. याप्रसंगी काँग्रेस नेते गौरीशंकर खुराना यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन प्रशासनाकडे तात्काळ न्यायाची मागणी केली.



​वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात मारेगाव तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राजू निमसटकर यांनी महसूल प्रशासनावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “जर महसूल प्रशासन पारदर्शक असते, तर रेती माफियांची पत्रकाराला धमकावण्यापर्यंत मजल गेली नसती. या सर्व प्रकरणात जबाबदार महसूल अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून, केवळ रेती माफियावरच नव्हे तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी.”


राज्याचे मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री यांना तहसीलदार मारेगाव यांचे मार्फत निवेदन दिल्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी सचिन मेश्राम यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला. जोपर्यंत रेती माफिया प्रदीप घागी याला अटक होत नाही, आपटी घाटाचा परवाना रद्द होत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी सचिन मेश्राम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही निमसटकर यांनी दिली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष अनिल खैरे, शहराध्यक्ष अनंता खाडे, महिला तालुका कार्याध्यक्ष यशोधरा लिहितकर, महिला तालुका महासचिव मंजुषा काटकर, शहर महासचिव विनेश मेश्राम, नंदू तामगाडगे,प्राणशील पाटील, चिंतामण वेले, रितेश काटकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होता.

प्रमुख मागण्यांवर पत्रकार मेश्राम ठाम :
1) आरोपी प्रदीप घागी याच्यावर ॲट्रॉसिटी आणि पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तात्काळ कारवाई करा.
​2) अवैध उपसा करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका.
​3) अवैध
उपशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन करा.
4) ​पत्रकार कुटुंबाला तात्काळ सुरक्षा पुरवा.

आता या गंभीर प्रकरणावर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पत्रकार सचिन मेश्राम आपल्या भूमिकेवर ठाम असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

​यवतमाळ जिह्याच्या मारेगावमध्ये रेती माफियांच्या धमकीविरुद्ध पत्रकार सचिन मेश्राम यांनी आजपासून ‘बेमुदत आमरण उपोषण’ सुरू केले आहे. या आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा पाठिंबा मिळत असून, वंचित बहुजन आघाडीने या लढ्यात थेट उडी घेतली आहे. ‘जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि दोषी महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही’, असा पवित्रा वंचितने घेतला आहे.
राजू निमसटकर : जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी विधानसभा प्रमुख
वंचित बहुजन आघाडी.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment