वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू.
“साहेब, आम्ही जगायचं की मरायचं ?” — संतप्त महिला शेतकऱ्यांचा सरकारला सवाल, न्याय न मिळाल्यास आंदोलकाचा आत्मदहनाचा इशारा.
मारेगांव : प्रतिनिधी
महसूल प्रशासनाचे लेखी आदेश असूनही खडकी–करणवाडी ते घोडदरा व नरसाळा या गावांना जोडणारा शिवधुरा (पांदण) रस्ता आजही अतिक्रमणमुक्त करण्यात आलेला नाही. तब्बल चार वेळा आमरण उपोषण, अनेक निवेदने आणि प्रशासनाची वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर करत असून, आंदोलकांनी बैलबंडी आणि जनावरांसह आंदोलनस्थळी ठिय्या देत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

चार उपोषणे… तरीही न्याय नाही.
आंदोलक संदीप सांबशिव उमरे यांनी सांगितले की, शिवरस्ता मोकळा करण्यासाठी आतापर्यंत चार वेळा आमरण उपोषण करण्यात आले. प्रत्येक वेळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच तत्कालीन नायब तहसीलदार रामगुंडे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले होते. त्यानंतर रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेशही काढण्यात आले, मात्र आजपर्यंत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही.

महसूल विभागावर गंभीर आरोप.
महसूल विभाग जाणीवपूर्वक कारवाई टाळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, उलट अतिक्रमणधारकांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यासाठी उपोषणकर्त्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप विद्यमान तहसीलदार उत्तम निलावाड यांच्यावर करण्यात आला.
आदेश असूनही कारवाई होत नसल्याने या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याची शंका उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

“आदेश दिले… पण अंमलबजावणी कोण करणार…?”
“महसूल विभाग स्वतःची जबाबदारी झटकत आहे. आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर त्या अन्यायाला जबाबदार कोण ?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
महिलांचा संताप : “साहेब, आम्ही जगायचं की मरायचं..?”
खडकी, करणवाडी, घोडदरा आणि नरसाळा परिसरातील मोठ्या संख्येने महिला शेतकरी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यांनी संदीप उमरे यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देत धरणे आंदोलन केले.
तहसीलदारांशी थेट चर्चा करत महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
“शेतात जाण्याचा रस्ता नाही… प्रशासन न्याय देत नाही… मग आम्ही जगायचं की मरायचं ?” असा हृदयस्पर्शी सवाल महिलांनी सरकारला केला.

न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
दरम्यान, आंदोलक संदीप उमरे यांनी भावनिक भूमिका घेत न्याय न मिळाल्यास अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला. या वक्तव्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे. हा संघर्ष केवळ एका शिवरस्त्याचा नाही; तर शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांचा हक्क आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा आहे. चार गावांतील शेकडो शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. आता पाहायचे एवढेच-प्रशासन प्रत्यक्ष कारवाई करणार, की शेतकऱ्यांचा संघर्ष आणखी उग्र होणार ?
| “चार वेळा उपोषण… आदेशही झाले… तरीही शिवरस्ता मोकळा नाही…! शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत; वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू निमसटकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू. ‘साहेब,आम्ही जगायचं की मरायचं ?’ असा संतप्त सवाल आता प्रशासनासमोर उभा आहे.” |







