कोलगावांत बैलपोळा सण उत्साहात साजरा… !दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांचा उत्साह कायम,शेकडो बैलजोड्यांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी आणि मिरवणुकीने रंगला बैलपोळा…!


यवतमाळ : मारेगांव
शेतकरी आणि त्याचा जिवाभावाचा सोबती असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपरिक बैलपोळा सण मारेगांव तालुक्यातील कोलगांव येथे यंदाही मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यंदा परिसरात दुष्काळी परिस्थिती असून पावसाचे प्रमाण अत्यल्प असतानाही बळीराजाचा उत्साह मात्र कमी झाला नाही. गावातील शेकडो बैलजोड्यांच्या सहभागातून कोलगांवमध्ये पारंपरिक बैलपोळ्याचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

ग्रामपंचायत कोलगांवच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याला गावचे पोलीस पाटील अरुण निमसटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सरपंच अभिषा निमसटकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, गावातील भजन मंडळी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोलगांवच्या बैलपोळ्याला अनेक वर्षांची पारंपरिक आणि भक्तिमय परंपरा लाभली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील सर्व बैलजोड्या एकत्रितपणे श्री सद्गुरू संत जगन्नाथ महाराज देवस्थान परिसरात आणण्यात आल्या. गावातील भजन मंडळी ढोल-ताशांचा निनाद, भजनाचा गजर आणि सजवलेल्या बैलजोड्यांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय तसेच उत्साहपूर्ण झाले होते.

कोलगांवात मागील अनेक वर्षांपासून प्रथम बैलजोडीला मान देण्याची परंपरा आहे. यावर्षी हा प्रथम मान संजय पारखी यांच्या बैलजोडीला देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथम मान मिळालेल्या बैलजोडीची विधिवत पूजा गावचे पोलीस पाटील अरुण निमसटकर यांच्या हस्ते करण्यात आली. बैलजोडीला पारंपरिक साज चढविण्यात आला. तसेच बैलजोडीचे मालक संजय पारखी यांचा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. आणी अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रथम मानाची ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली.

प्रथम मानाच्या बैलजोडीसमोर बांधलेल्या तोरणातून बैलजोडी पुढे नेण्यात आली आणि पारंपरिक पद्धतीने तोरण तोडण्यात आले. या क्षणी उपस्थित ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे सजलेल्या बैलजोड्यांच्या या मिरवणुकीने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यानंतर घरोघरी बैलांची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. आणी पारंपरिक प्रथेनुसार बैलांचा सन्मान करून बळीराजाने आपल्या कष्टकरी साथीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करणाऱ्या बैलांसाठी हा दिवस विशेष असतो. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीची चिंता असतानाही शेतकऱ्यांनी आपल्या बैलांचा उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला.

कोलगांवचा बैलपोळा हा केवळ बैलांचा सण नसून शेती, शेतकरी, बैल, परंपरा, श्रद्धा आणि ग्रामएकतेचा अनोखा संगम आहे. गावातील सर्व बैलजोड्या एकाच ठिकाणी एकत्र येणे, गण म्हणणे, संत जगन्नाथ महाराजांच्या देवस्थानात आरती व पूजन करणे, गुढी फिरविणे, तोरण तोडणे आणि त्यानंतर घरोघरी बैलांची पूजा करणे—या सर्व परंपरा आजही कोलगांवकरांनी जपून ठेवल्या आहेत.


दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या केल्या असल्या तरी आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ज्योत मात्र कोलगांवकरांनी तेवत ठेवली. आपल्या बैलांप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करत बळीराजाने यंदाही बैलपोळा सण मोठ्या आनंदाने साजरा केला.
कोलगांवच्या या पारंपरिक बैलपोळ्यातून “बैल आहे म्हणून शेती आहे आणि शेती आहे म्हणून बळीराजाचे जीवन आहे” हा भाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment