डिजिटल युगातही शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण -राजू निमसटकर


​यवतमाळ (मारेगांव प्रतिनिधी) :

संपूर्ण देशभरात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच, यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगांव तालुक्यातील कोलगांव येथील प्राथमिक शाळेत एक अत्यंत प्रेरणादायी सोहळा संपन्न झाला.
ग्रामपंचायत आणि ग्रामशिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच केंद्र समन्वयक पदी निवड झालेल्या स्थानिक शिक्षकांचा आणि केंद्रप्रमुखांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महादीप परीक्षा, भारत टॅलेंट्स सर्च परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या कु. कल्याणी नागरकर, कु. आर्या गौरकार, कु. लावण्या लोडे, तन्मय चिट्टलवार, कु. लक्ष्मी पारखी आणि कु. चैताली बोबडे या चिमुकल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना भारतीय संविधानाची प्रत, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र तथा स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
​याच सोहळ्यात, केंद्र समन्वयक पदी निवड झालेले कोलगांव येथीलचं शिक्षक विजय घोडमारे, प्रवीण बेहेरे आणि शाळेचे केंद्र समन्वयक चिनू निरंजने यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांना कोलगांवच्या सरपंच सौ. अभिषा निमसटकर आणि ग्रामशिक्षण समितीच्या अध्यक्ष श्रीमती मंगला उमरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


शिक्षक हे विद्यार्थ्यांनां केवळ पुस्तकी ज्ञानचं देत नाहीत, तर शिक्षक हे विद्यार्थ्यांनां जीवनाचे धडे देखील शिकवतात.
शिक्षक ज्ञानरूपी दिवा आहे, जे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करतात. शिक्षक हे आपल्या आई-वडिलांनंतरचे दुसरे महत्त्वाचे मार्गदर्शक असतात, जे आपले भविष्य घडवतात. म्हणूनचं तर,
आजच्या डिजिटल युगातही शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही. ते तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे शिकवतात देखील, त्यामुळेचं आजच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्या योगदानाबद्दल आपण कायम कृतज्ञ राहिले पाहिजे.
हे जरी खरे असले तरी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर शिक्षकांनी भर न देता, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचे बळ देखील निर्माण केले पाहिजे, असे उपस्थितांना संबोधित करताना ग्राम शिक्षण समितीचे शिक्षण तज्ज्ञ राजू निमसटकर यांनी शिक्षकांना आवाहन केले.

आयोजित सोहळ्यात सत्कारमूर्तींनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना, ‘आम्ही याच शाळेत शिकून मोठे झालो आहोत, त्यामुळे समाजाप्रतीची आणि गावाची जबाबदारी ओळखून शैक्षणिक क्षेत्रात गावाचा विकास करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू,’ असे अभिवचन दिले.
​कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रामपंचायत आणि ग्राम शिक्षण समितीने केले होते. यासाठी ग्राम शिक्षण समितीचे राजू निमसटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल शंबरकर सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पैकूजी आत्राम सर यांनी मानले. या सोहळ्याला ग्रामस्थ आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment