“वंचितचा संघर्षाला सलाम…!”


मारेगांव : प्रतिनिधी
एखाद्या व्यक्तीचा सत्कार हा केवळ त्याच्या यशाचा सत्कार नसतो तर तो त्याच्या संघर्षाचा, त्याच्या त्यागाचा, अश्रूंनी भिजलेल्या स्वप्नांचा आणि समाजासाठी उभ्या राहिलेल्या प्रेरणेचाही असतो. मारेगावच्या मातीत जन्मलेला, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत UPSC CAPF AC Exam 2025 मध्ये यश मिळवून Assistant Commandant (Class-I Gazetted Officer) बनलेला हेमंत लता शंकर बुजाडे याचा असाच हृदयस्पर्शी सन्मान त्याच्या राहत्या घरी जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला.

कोणत्याही मोठ्या सभागृहात नव्हे, तर संघर्षाचा साक्षीदार असलेल्या त्या साध्याशा घरात हा सत्कार सोहळा पार पडला. त्यामुळे उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळून गेले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मारेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मुन, शहराध्यक्ष अनंता खाडे, विनेश मेश्राम, जेष्ठ पत्रकार नरेंद्र वैरागडे, महिला आघाडी शहराध्यक्ष रेखाताई काटकर, समता सैनिक दलाचे संजय जिवणे, मारतीय बौद्धमहासभेच गौतम मालखेडे, रमेशजी टाकसांडे यांचेसह मारेगांव शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

हेमंतचा प्रवास म्हणजे गरिबीशी, संकटांशी आणि नियतीशी केलेला थेट सामनाचं म्हणावा लागेल. वडिलांचे दीर्घ आजारपण, आईची मोलमजुरी, घरातील आर्थिक विवंचना, पुण्यात शिक्षण घेताना पार्टटाईम नोकरी आणि तासन्तास अभ्यास… या प्रत्येक संघर्षातून तो अधिक मजबूत होत गेला. त्याच्या आयुष्याचा हा प्रवास आज हजारो तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरला आहे. यावेळी रमाताई दुपारे, स्वातीताई दारुंडे, मेश्रामताई सह गोवर्धनताई, नंदु तामगाडगे, राहुल भालशंकर, यांचेसह वंचित बहुजन आघाडी महिला-पुरुष पदाधिकाऱ्यांनी हेमंतच्या आईलाही विशेष अभिवादन केले. कारण अधिकारी घडलेला मुलगा जितका मोठा आहे, तितकीच त्याला घडवणारी आईही मोठी आहे. तिच्या कष्टांचा, त्यागाचा आणि शिक्षणावरील विश्वासाचा हा विजय असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

राजू निमसटकर यांची भावनिक प्रतिक्रिया…

“आज आम्ही एका अधिकाऱ्याचा सत्कार करण्यासाठी जसे आलो होतो, तसेचं आम्ही एका आईच्या कष्टांना आणी एका मुलाच्या जिद्दीला आणि विश्वरत्न बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या संदेशाला अभिवादन करण्यासाठी देखील आलो होतो.
हेमंत बुजाडे यांचे यश हे जसे त्यांच्या कुटुंबाचे यश आहे , तितकेच ते संपूर्ण आंबेडकरी आणि बहुजन समाजाच्या स्वाभिमानाचे देखील यश आहे. समाजातील प्रत्येक मुलाने, प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक विद्यार्थ्याने या संघर्षातून प्रेरणा घ्यावी. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, प्रामाणिक परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतेही शिखर गाठता येते, हे हेमंतने कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे.
आम्ही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. अशेचं अधिकारी घडत राहिले, तर बाबासाहेबांचे समतामूलक भारताचे स्वप्न अधिक वेगाने साकार होईल.” या शब्दांनी उपस्थित वातावरण अधिक भावूक झाले.

समाजातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही हेमंतचे उदाहरण प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजे, असे मत व्यक्त केले. मोबाईलच्या आहारी जाणाऱ्या तरुणांनी हेमंतच्या जिद्दीचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. आज हेमंत बुजाडे हा फक्त एका कुटुंबाचा मुलगा राहिलेला नाही; तो संपूर्ण विदर्भातील, आंबेडकरी आणि बहुजन समाजातील लाखो विद्यार्थ्यांच्या आशेचा किरण बनला आहे.
“गरिबी अडथळा असू शकते; पण ती यशाची मर्यादा कधीच ठरू शकत नाही”. जिद्द, शिक्षण आणि बाबासाहेबांच्या विचारांवर विश्वास असेल, तर चंद्रमोळी झोपडीतूनही क्लास-वन अधिकारी घडू शकतो”. हे हेमेंत ने दाखवून दिले आहे, म्हणूनचं…हेमंत बुजाडे यांच्या संघर्षाला, त्यांच्या आईच्या त्यागाला आणि त्यांच्या अथक जिद्दीला आम्हा सर्व आंबेडकरी बहुजन समाजाचा मानाचा सलाम…!


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment