श्री संत जगन्नाथ महाराज प्राणप्रतिष्ठा व जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
मारेगाव (प्रतिनिधी) :
तालुक्यातील कोलगाव येथे ‘आराध्य दैवत वंदनीय विदेही सद्गुरु श्री संत जगन्नाथ महाराज’ यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा तिसरा वर्धापन दिन आणि जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १५ व १६ एप्रिल २०२६ रोजी भव्य दोन दिवशीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोलगाव ग्रामवासीयांच्या अथक परिश्रमातून आणि दानदात्यांच्या सहकार्यातून उभारलेल्या या अलौकिक देवस्थानच्या प्रांगणात हा भक्तिमय सोहळा संपन्न होणार आहे.

बुधवार दिनांक १५ एप्रिलला सकाळी १०:१० वाजता मूर्ती वंदन सोहळा व महाप्रसाद (घुगरी काला) होईल. दुपारी १२ वाजल्यापासून भव्य ‘भजन संमेलन’ सुरू होईल. सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध भारुड सम्राट ह.भ.प. निंबाजी महाराज तागड (वाशिम) व संच यांचा ‘रंगीत तथा संगीत संच भारुड’ कार्यक्रम होईल.

गुरुवार दिनांक १६ एप्रिलला सकाळी १० वाजल्यापासून उर्वरित भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. सौ. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर यांचे ‘काल्याचे कीर्तन’ होईल. दुपारी ४ वाजता महाप्रसाद व त्यानंतर महाभोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता ‘भजनसंध्या’ कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता होईल.

आयोजित सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त कोलगाव ग्रामवासीयांच्या वतीने ‘विनीत’ म्हणून करण्यात आले आहे.







