चिमुकल्यांनी राखली परंपरा कायम…!


प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल झरी तालुक्यातील वेडद येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात या शाळेतील तब्बल चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून गावाचे नाव उंचावले आहे. गावकऱ्यांनी या चिमुकल्यांचे जंगी स्वागत केले असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि अतिदुर्गम मानल्या जाणाऱ्या झरी तालुक्यातील वेडद गावाने आज शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर येथील जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत बाजी मारली आहे. यामध्ये…
पूरब गावंडे (९५%),
सानिया धोबे (९३.५०%),
प्रतीक घुंगरुड (९१.२५%) आणि सात्विक चौधरी (९१.२५%) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
​विशेष म्हणजे, या शाळेने आपली यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. गेल्या वर्षी दोन विद्यार्थी पात्र झाले होते, तर यावर्षी ही संख्या चारवर पोहोचली आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय शाळेतील पेंदोर सर, लोहकरे सर, आणी तेजस सर या शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले जात आहे. दुर्गम भाग असूनही खाजगी शाळांना टक्कर देणारे शिक्षण येथे मिळत असल्याचे या निकालावरून सिद्ध झाले आहे.

​विद्यार्थ्यांच्या या यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गावातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच शाळेत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका शिक्षणाधिकारी खैरनार, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव आपल्या लेकरांच्या कौतुकासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

“प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. अशीच काहीशी शैक्षणिक गुणवत्ता आदिवासी अतिदुर्ग भाग असलेल्या झरी तालुक्याच्या वेडद गावात बघायला मिळते आहे.”


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment