आता,
मनसेच्या रडारवर आरोग्य विभाग…!


● शिरपूर प्रा.आ.केंद्र रामभरोसे
● वेळीच आरोग्य केंद्र नीट करा
● अन्यथा, खळखट्याक…

वणी : राजू निमसटकर

वणी विधानसभा मतदार संघात सरकारची म्हणून आरोग्य यंत्रणा आहे की नाही ? हा खरा तर सर्वसामान्यांचा प्रश्न असून, ढेपाळलेल्या सरकारी ग्रामीण आरोग्य यंत्रनेचे हाल नं विचारलेले बरे. मात्र, हाच जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आता मनसेच्या रडारवर आला असून तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी यांना निवेदनातून सज्जड दम देत, याबाबतचे मनसे स्टाईल निवेदन देण्यात आले आहे.

वणी तालुक्याच्या शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढेपाळलेला कारभार सध्या सर्वत्रच चर्चेचा विषय आहे. आता याला वठणीवर आणण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला असल्याचे दिसते आहे. याबाबतचे निवेदन मनसेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकर आणी वणी शहर अध्यक्ष शिवा पेचे यांचे नेतृत्वात नुकेतेच तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी यांना देण्यात आले असून ढेपाळलेल्या यंत्रनेला त्वरित वठणीवर आणले नाही तर मनसेचा खळखट्याक बघायला मिळेल असा सज्जड दम निवेदनातून देण्यात आला आहे.

वणी तालुक्याच्या शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर औषधांचा अभाव असून ओपीडी वेळेवर होत नाही. अत्यावश्यक रुग्नसेवेसाठी कर्मचारी हजर नसतात त्यामुळे अत्यावश्यक रुग्णसेवेचे तीन तेरा वाजले आहे. साध्या रुग्णाला सुद्धा रेफर केल्या जात असल्याचे वास्तव आहे. कुत्रा चावल्यावर आवश्यक असणारी साधी रेबीजची लस देखील आरोग्य केंद्रात उपलब्ध नाही. इतकेच नाही तर, स्तनदा माता, गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्य सेवेसाठी असणारी १०२ नंबरची रुग्णसेवा देखील शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपलब्ध नाही. असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून मनसेच्या वतीने समस्यांचा पाढा निवेदनातून वाचल्या गेला आहे.

सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा असलेला आरोग्याचा प्रश्न वेळीच निकाली निघावा म्हणून मनसेच्या वतीने निवेदनातून काही उपाययोजना ही सुचविल्या गेल्या आहेत. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेवर तसेच सायंकाळी सुद्धा ओपीडी (OPD) चालू करावी तसेच औषधींचा साठा तात्काळ भरावा व १०८ रुग्णवाहिका त्वरित सुरु करण्यात यावी. अशा प्रकारच्या उपाययोजना देखील निवेदनातून मनसेच्या वतीने सुचविण्यात आले आहे. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर वणी शहराध्यक्ष शिवा पेचे, चंद्रशेखर पाचभाई, मोरेश्वर ननकटे,अंकुश ननकटे, जहरूल शेख, गजानन धगडी, गौरव सोनटक्के, सुरज काकडे, प्रवीण गिरोले, राहुल पचारे, पवन घोंगे यांचे सह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.


वणी विधानसभा मतदार संघातील शहरासह ग्रामीण भागातील ढेपाळलेल्या आरोग्य यंत्रणे बरोबरच शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार येत्या आठ दिवसाचे आत थांबला नाही आणी सुचविलेल्या उपाययोजना अमलात आल्या नाही तर, मनसेच्या वतीने मनसे स्टाईल तीव्र खळखट्यात आंदोलन छेडले जाईल. यावेळी बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेला सर्वस्वी आरोग्य प्रशासन जबाबदार असेल.
फाल्गुन गोहकार – शिवा पेचे


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment