● आवाज माझाच्या बातमीचा दणका ● फूटक्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू ● अक्षम्य दुर्लक्षितपणा चव्हाट्यावर |
वणी : राजू निमसटकर
इकडे पाण्याच्या बोंबा,
तिकडे बेजबाबदारपणाचा कळस… या मथळ्याखाली आवाज माझा चे माध्यमातून प्रकाशित झालेल्या बातमीची अखेर प्रशासनाने दखल घेतली आणि सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला पुन्हा एकदा फोडून, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती केल्या जात आहे. आता यालाच ” अखेर, प्रशासनाला आली उपरती ” असेच म्हणावे काय ? याविषयीची खमंग चर्चा संपूर्ण शहरभर आहे.
वणी शहरातील रेल्वे क्रॉसिंग ते साई मंदिर या अत्यंत महत्त्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या रस्ता निर्मितीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्षितपणा आणि कंत्राटदाराचा रस्ता निर्मितीतील गुणवत्तेबाबतचा बेजबाबदारपणा पुरता चव्हाट्यावर आला आहे. पाणी पुरवठ्याच्या फुटक्या पाईपलाईन वरच सिमेंट काँक्रीटचे रस्ता बांधकाम केल्या जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे. यात नेमके कुणाचे उखड पांढरे होणार होते हे आता जनतेला कळुन चुकले आहे.
वणी शहरवाशी मागील अनेक महिन्यांपासून भीषण पाणी समस्येसह आरोग्यास हानिकारक असलेल्या पाणी समस्येला सामोरा जात आहे. कधी कलर युक्त तर कधी घाण युक्त, कधी कधी तर चक्क पिण्याच्या पाण्यातुन जंतु (नारु) सदृश्य अण्डुळ्या देखील नळाद्वारे येत असल्याच्या शहरातील अनेक प्रभागामधिल नागरिकांच्या तक्रारी आहेत. याला शहरातील ठिकठिकाणी पाणीपुरवठ्याची फुटलेली पाईपलाईन हे महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण असल्याचेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे होते. मात्र तरीही, आरोग्या सारखा गंभीर प्रश्न असतानाही वणी नगर परिषद प्रशासनाने वणीकरांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. परिणामस्वरूप वणी शहरातील अनेक प्रभागात आरोग्यास हानिकारक असलेल्या पाणी समस्येचे भयावह वास्तव कालही होते आणी आजही आहे.
शहराच्या विकासात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यावरील सिमेंट काँक्रीटच्या बांधकामानंतर भविष्यातील वाहतूक, अतिक्रमण व सांडपाणी वाहून नेण्यासारख्या समस्या मार्गी लागणार आहे. याच महत्वाकांक्षी उदेश्याला रस्ता निर्माणाचे काळात हरताळ फासल्या जात असल्याची तक्रार पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते राजू तुराणकर यांनी प्रशासनासह आपले सरकार पोर्टलवर केली. याच गंभीर घटनेची दखल घेत आवाज माझाने, ” इकडे पाण्याच्या बोंबा, तिकडे बेजबाबदारपणाचा कळस…” या मथळ्याखाली बातमीचे वृत्तांकन केले. आणी शेवटी प्रशासन खळबडून जागे झाले, हे विशेष.
विकासकामाला कुणाचाच विरोध नसावा, मात्र विकास कामाचे नावावर जर का जनतेच्या पैशाची वारेमाप उधळण होत असेल तर मग विरोध व्हायलाच हवा. दुर्दैवाने राजकीय स्टंटबाजीत विभागातला विरोधक जरी सक्रिय असला तरी मात्र जनतेच्या प्रति असलेल्या बांधिलकीची जबाबदारी स्वीकारणारा विरोधक मात्र जिवंत रुपाने विभागात दिसत नाही, ही खरी तर सार्वत्रिक खंत आहे. आणि म्हणूनच, प्रशासनासह कंत्राटदाराचे फावते आहे. हे उघड सत्य कुणी नाकारू शकत नाही. |