इकडे पाण्याची बोंब,
तिकडे बेजबाबदारपणाचा कळस…!


● महत्त्वकांक्षी रस्ता निर्मितीला भगदाड
● फूटक्या पाईपलाईन वरच बांधकाम
● न.प. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
● जनप्रतिनिधींची चुप्पी

वणी : राजू निमसटकर

वणी शहरातील रेल्वे क्रॉसिंग ते साई मंदिर या अत्यंत महत्त्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या रस्त्याची पायाभरणी सुरू झाली. मात्र, नेमक्या पायाभरणीतच रस्ता निर्मितीची गुणवत्ता आणि प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्षितपणा पुढे आला. फुटक्या पाईपलाईन वरच रस्ता बांधकामाचा इमला रचला जात असल्याने ” इकडे पाण्याच्या बोंबा आणि तिकडे बेजबाबदारपणाचा कळस ” असंच काहीसं म्हणण्याची वेळ आता वणीकरांवर येऊन ठेपली आहे.

वणी शहराच्या विकासात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे क्रॉसिंग ते साई मंदिर या रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचे बांधकाम सुरू झाले. भविष्यातील वाहतूक, अतिक्रमण व सांडपाणी वाहून नेण्यासारख्या समस्या यामुळे मार्गी लागणार आहे. मात्र, ज्या महत्वाकांक्षी उदेश्याने रस्ता निर्माणाचे काम होत आहे नेमका त्यालाच हरताळ फासल्या जात असल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे. रस्ता निर्माणाचे वेळी रस्त्यामध्ये येणारी पाणी पुरवठा लाईन असो वा त्यावर असलेले लिकेज, हॆ दुरुस्त करूनच रस्ता निर्माणाचे काम व्हायला हवे. मात्र, ते लिकेज दुरुस्त न करता त्यावरच सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामं केल्या जात आहे. हे नगरपरिषद प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांच्या अक्षम्य दुर्लक्षितपणाचे मसालेदार उदाहरण आहे.

इकडे, वणी शहरवाशीयांना मागील अनेक महिन्यांपासून भीषण पाणी समस्येसह आरोग्यास हानिकारक असलेल्या पाणी समस्येला सामोरा जावे लागत आहे. कधी कलर युक्त तर कधी घाण युक्त, कधी कधी तर चक्क पिण्याच्या पाण्यातुन जंतु सदृश्य अण्डुळ्या देखील नळाद्वारे येत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या होत्या. आरोग्या सारखा गंभीर प्रश्न असतानाही वणी नगर परिषद प्रशासनाने वणीकरांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. परिणामस्वरूप वणी शहरातील अनेक प्रभागात आरोग्यास हानिकारक असलेल्या पाणी समस्येचे भयावह आजही वास्तव उभे आहे.

दुसरीकडे मात्र, लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी रस्ता निर्मितीमध्ये रस्त्यामधून जात असलेली पाणी पुरवठ्याची पाईप लाईन लिकेज असल्याबाबतची तक्रार देवूनही, निद्रिस्त न. प. प्रशासनाला जाग येत नसल्या बाबतची खंत तक्रारकर्ते राजू तुरानकर यांनी आवाज माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.


पाणी प्रश्नाच्या संदर्भाने मागील दोन महिन्यापासून आम्ही मुख्याधिकारी नगरपरिषद वणी यांच्या संपर्कात आहोत. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या लिकेज संदर्भात मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून सांगितले. इतकेच नाही तर त्या ठिकाणचे फोटो देखील काढून व्हाट्सअप वर पाठवीले. मात्र तरीही मुख्याधिकाऱ्यांनी या संदर्भात लक्ष घातले नाही, त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे.
राजू तुराणकर
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता वणी


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment