● ३१ मार्च सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस
● जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली सेवेची दखल
वणी : राजू निमसटकर
तब्बल ३४ वर्षाची पोलीस दलात सेवा आणी सेवानिवृत्तीला अगदी काहीच दिवस बाकी असतांना, वणी पोलीस स्टेशन मध्ये ASI पदावर कार्यरत असलेले डोमाजी भादीकर यांची नुकतीच PSI पदावर पदोन्नती झाली. हा त्यांच्या सेवा कार्याचा गौरवच असून त्यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अत्यंत विषम परिस्थितीत असलेलं डोमाजी बापूराव भादीकर कुटुंब, वणी तालुक्याच्या साखरा दरा या गावचे मूळ रहिवासी. लहानपणापासूनच डोमाजींना शिक्षणाची आणि देशसेवेची ओढ होतीच. आणि म्हणूनच, गावच्या जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षणानंतर घोंसा-कुंभा-वणी असा डोमाजी भादीकर यांचा शिक्षणाचा प्रवास राहिला. कुटुंबाची जबाबदारी आणि देशसेवेची ओढ, वयाच्या अगदी २२ व्या वर्षी डोमाजींना बीएसएफ (BSF) मध्ये घेऊन गेली. पाकिस्तान बॉर्डर वरचे दिवस आजही त्यांच्या स्मरणात आहेत.
१९८९ साली पोलीस दलात, पोलीस शिपाई म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली आणि तीही यवतमाळ जिल्हा पोलीस मुख्यालयात. पुढे पांढरकवडा पोलीस स्टेशन त्यानंतर मारेगाव, वडकी, पुसद, परत मारेगाव आणि आता वणी. असा पोलीस दलातील सेवेचा काळ राहिला. याच दरम्यान २०१९ ला डोमाजी बापूराव भादीकर यांची पोलीस शिपाई पदावरून एएसआय (ASI) या पदावर पदोन्नती झाली. असा तब्बल ३३ वर्षाचा पोलीस दलातील सेवेचा काळ. आणि आता ३१ मार्च २०२३ हा पोलीस सेवेतील शेवटचा दिवस.
डोमाजी बापूराव भादिकर यांची पोलीस सेवेतील कारकीर्द जेवढी कर्तव्य तत्पर होती तेवढीच ती माणसातलं माणूसपण जपणारी देखील राहिली आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गुन्हे आणि गुन्हेगारांना उघडकीस आणले असून वणी पोलीस स्टेशन मध्ये काही काळ ते डीबी (DB) पथकाचे प्रमुख देखील होते. पोलीस दलातील डोमाजी भादिकर यांच्या याच सेवा कार्याची दखल घेत, यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांनी वणी पोलीस स्टेशन मध्ये (ASI) पदावर कार्यरत असलेले डोमाजी बापूराव भादीकर यांची १३ मार्चला (PSI) पदावर पदोन्नती केली. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील होत आहे.
देश सेवेच्या कार्या बरोबरच पोलीस दलातील माझ्या ३४ वर्षाच्या सेवा काळाची दखल घेत, मा. यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांनी माझ्या पोलीस दलातील सेवानिवृत्तीच्या शेवटच्या काळात, माझी एएसआय (ASI) पदावरून पीएसआय (PSI) पदावर पदोन्नती केली. मी साहेबांचे मनापासून आभार मानतो. डोमाजी बापूराव भादिकर पीएसआय (PSI) पोलीस स्टेशन, वणी |