● वणी-करंजी राज्य महामार्गावर ● नवरगावच्या बंगाली डॉ. हाजरा यांचा ● तब्बल दोन तासाचा सिनेस्टाईल थरार ● चार दरोडेखोरांकडून अपहरणाचा प्रयत्न ● रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूटले पावणे चार लाख |
मारेगाव : राजू निमसटकर
मागील दोन दशक पूर्वीपासून मारेगाव तालुक्याचे नवरगाव येथे वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले बंगाली डॉक्टर हाजरा यांना, नवरगाव वरून मारेगाव कडे परतत असताना, बंदुकीचा धाक दाखवीत चार दरोडेखोर युवकांनी लुटले. तब्बल दोन तासाच्या सिनेस्टाईल काळजाचा ठोका चुकविणाऱ्या थरारातून, पावणे चार लाख रुपयाची लुट झाल्याची धक्कादायक घटना, १३ मार्च चे रात्री करंजी-मारेगाव-वणी राज्य महामार्गावर घडली.
आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या मारेगाव तालुक्याचे नवरगाव येथे बंगाली डॉ. पोभास रवींद्रनाथ हाजरा हे मागील दोन दशक पूर्वीपासून वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. आदिवासी बहुल असलेल्या भागात बंगाली डॉ. हाजरा यांनी वैद्यकीय व्यवसायात चांगलीच पकड तयार केली आहे. त्यातूनच त्यांचा वैद्यकीय व्यवसाय अत्यंत जोमात देखील चालला होता. पूर्वी ते नवरगाव येथेच वास्तव्यास होते. मात्र, काही वर्षांपूर्वी पासून ते मारेगाव शहरातील मंगलम पार्क येथे वास्तव्यास आहे.
नेहमीप्रमाणे वैद्यकीय व्यवसाय आटपून बंगाली डॉ. हाजरा सोमवारचे रात्री ७.३० वाजताचे दरम्यान मारेगाव कडे आपल्या दुचाकी वाहनाने परत येत होते. मारेगाव कडून स्विफ्ट कारने आलेल्या दरोडेखोरांनी मारेगाव शहरालगत असलेल्या नायरा पेट्रोल पंप समोर डॉ. हाजरा यांची दुचाकी अडवित त्यांना गाडीत कोंबले व डॉ. हाजरा यांना करंजी मार्गे घेऊन गेले. दरम्यानचे काळात दरोडेखोर युवकांनी चाकू आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवित डॉ. हाजरा यांचे कडून २४ हजार रुपये रोख रकमेसह १५ हजार रुपयाची सोन्याची अंगठी , ३० हजार रुपयांची सोन्याची चैन , मोबाईल असा ऐवज ताब्यात घेतला. इतक्यावरच दरोडेखोर युवक थांबले नाही तर त्यांनी तब्बल २५ लाख रुपयाची मागणी करीत अपहरण करून हत्या करण्याची धमकी देखील डॉ. हाजरा यांना दिली. |
काळजाचा ठोका चुकविणाऱ्या आणि कमालीच्या दहशतीत आलेल्या डॉ. हाजरा यांनी भितीपोटी वणी येथील एका मित्राला फोन करून पैशाची जुळवाजुळव करीत तीन लाख रुपये दरोडेखोर युवकांना देण्याचे कबुल केले. तशी व्यवस्था वणी येथील मित्राकडून डॉ. हाजरा यांनी केली. लागलीच दरोडेखोर युवकांनी डॉ. हाजरा यांना त्याच गाडीत कोंबून कार सरळ वणीकडे रवाना केली.
वणी येथे आल्यावर डॉ. हाजरा यांनी मित्राकडून बोलाविलेले रोख तीन लाख रुपये दरोडेखोर युवकांने ताब्यात घेत कार मारेगावच्या दिशेने रवाना झाली. काही अंतरावर आल्यानंतर दरोडेखोर युवकांनी डॉ.हाजरा यांना सोडून दिले व कारसह पोबारा केला.
तब्बल दोन तासाच्या सिनेस्टाईल लुटमारीची तक्रार मारेगाव पोलिसात डॉ. हादरा यांचे कडून दाखल करण्यात आली असून अज्ञात इसमा विरोधात, भारतीय हत्यार कायद्यासह बळजबरीने अपहरण करून गंभीर दुखापत करणे , शस्र बाळगून जीवे मारण्याची धमकी देत लूटमार करणे अशा विविध कलमान्वये, कलम ३९२, ३६३, ३६४ (अ), ३/२५, ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अगदी वर्दळीच्या राज्य महामार्ग क्रमांक सहा वरती रिव्हॉल्व्हर सह चाकूचा धाक दाखवित, तीन पोलीस स्टेशन सह जिल्हा वाहतूक शाखेला आव्हान देत दरोडा टाकण्याऱ्या टोळीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता पोलिस प्रशासना समोर उभे ठाकले आहे.