वणी नगरपालिका प्रशासन खेळतेय,
नागरिकांच्या जीवाशी !
वणी : राजु निमसटकर
वणी शहराची भूमी आणि परिसर पाण्यासाठी उजाड नाही, तरीही मागील अनेक वर्षापासून वणीकरांना पाणी समस्येला सामोरा जावे लागते आहे. आता तर कहरच झालाय, शहराच्या अनेक भागात अनियमित पाणीपुरवठया बरोबरच, घाण युक्त पाणी वणीकरांना दिल्या जात असून नागरिकांच्या आरोग्याशीच नव्हे तर जीवाशी खेळण्याच महापातक वणी नगरपालिका प्रशासन करते आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक असून या विरोधात नागरिकांनी वरिष्ठांना निवेदन देत जन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मागील तीन महिन्यापासून अशुद्ध व अनियमित पाणी पुरवठा वणीकर जनतेला होत असल्याने महिलांनी अनेकदा मुख्याधिकारी व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना भेटून समस्या मांडल्या. परंतु कंत्राटदाराला सांगतोय तुम्ही परत जा, असे महिलांना बेजवाबदारपणे उत्तर देऊन परत पाठवीले गेले. मात्र, मुख्याधिकारी एकदाही परिसरात फिरकले नाही. केवळ कंत्राटदाराला सांगतोय असे सांगून जनतेला मूर्ख बनविले जातं असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
शहराच्या गुरूनगर, प्रगतीनगर, भोंगळे लेआऊट, इंदिरा चौक तथा जैन लेआऊट परिसरातील असंख्य महिला वणी नगर परिषद मुख्याधिका-यासह आमदार महोदयांना भेटल्या असता, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी प्रत्यक्ष वार्डात येऊन महिलांचे समाधान केले. असेही येथील महिलांचे म्हणणे आहे. मात्र, आमदारांसमोर कंत्राटदारानी उदयाच पाणी पोहचेल म्हणून वेळ मारून नेली. कृती शून्य नियोजन व ठेकेदारांवर मुख्याधिकारी, प्रशासनाचा कसलाही धाक वा वचक नसल्याने शेवटी जैसे थेच राहिले, असाही आरोप तेथील महिलांचा आहे.
निर्गुडा व वर्धा नदीवर स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व संपूर्ण शहरांत २२ बोरवेल जिवंत असतांना वणीकर जनतेला तीन दिवसाआड पाणी पुरवठा, म्हणजे वर्षातून केवळ चार महिनेच पाणी पुरवठा केला जात आहे. आणी दुसरीकडे जनते कडून मात्र वार्षिक टॅक्स, पाणीकर वसुली सक्तीने केल्या जात आहे.
पाण्याच्या टाक्या दरमहा साफ केल्या जात नाही. कोणत्याही पाण्याच्या टाकीवर सुरक्षा रक्षक नाही. हि बाब वणीकर जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र या सर्व बाबीचे ना कंत्राटदाराला देणे घेणे आहे ना मुख्याधिकारी साहेबांना. या सर्व बाबीची चौकशी करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मुख्याधिकारी यांचेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना एका निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती तहसीलदार तथा प्रशासक वणी नगर परिषद यांना देण्यात आल्या आहे. यावेळी राजु तुराणकर, मंगल भोंगळे, सुदाम गावंडे, महेश पाहपळे, शुभांगी सपाट, ललिता वाडस्कर, ज्योती कापसे, गीता तुराणकर, कुंदा नांदे, साधना तुराणकर, जोस्त्ना सुरपाम, तुळसा नगराळे, विद्या वानखेडे, सिमा खोब्रागडे, सवित्ता ताजने, संजीवनी मोहितकर, सुरेखा डोंगे, सुरेखा बोधे, ज्योति नगराळे, सुनीता संजय चार्लेकर, सुरेखा झाडे, बल्की ताई, पेटकर ताई, सविता ठाकरे, ज्योति तुराणकर, पुजा ढाले, रजनी ताजने, माला प्रभाकर, कमल झाडे, सुरेखा चिट्टलवार, संगीता हेपट, मीनाक्षी मजगवळी यांचेसह असंख्य महिला उपस्थित होत्या.
जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत जलशुद्धिकरणासाठी करण्यात येणारी कार्यवाही ही अधिक परिणामकारक, निर्दाेष व नियोजनबध्द व्हावी व जनतेला शुद्ध,स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा यासाठी अनेकदा नगर परिषद मुख्याधिकारी यांना कळविले. मात्र ते अशुद्ध पाणी पुरवठा करून जनतेच्या आरोग्यासी खेळत आहे. हि अतिशय गंभीर बाब आहे. सर्व वार्डातून पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणी करून मुख्याधिकारी दोषी आढल्यास जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी कठोर कारवाई करावी. अन्यथा, वणी नगर पालिकेवर ” दे दणका मोर्चा ” काढण्यात येईल. राजु तुराणकर माजी नगरसेवक – वणी |
सदरच्या तक्रारीबाबत…
अभिजीत वायकोस मुख्याधिकारी नगर परिषद वणी, यांचेशी दूरध्वनीवरून थेट संपर्क साधला असता माहिती दिली.
तक्रारीची दखल घेतल्या गेली. रविवार पर्यंत प्रश्न सुटेल. नदीमध्ये पाणी सोडल्यामुळे नदीमधील घाण साफ होणे सुरू झाले आहे. लवकरच स्वच्छ. पाणीपुरवठा नियमित सुरू होईल. अभिजीत वायकोस मुख्याधिकारी – न.प.वणी |