- पोलिसांनी सावधानता बाळगत अनेक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात.
- मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष.
वणी – राजू निमसटकर
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर मुंबई दादर मधील शिवाजी पार्क परिसरात अज्ञात टोळक्यांनी ३ मार्च चे सकाळी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. आणि इकडे आंदोलनाची भूमी समजल्या जाणाऱ्या वणीच्या भूमीत अगडोंब उडाला. मनसे कार्यकर्त्याकडून उस्फूर्तपणे रस्त्यावर टायर पेटवीत, जाळपोळ करीत, त्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध नोंदविला गेला.
मनसेची बुलंद तोफ म्हणून समजले जाणारे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचे वर ३ मार्च चे सकाळी दादर शिवाजी पार्क मध्ये ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक साठी गेले असता, त्यांच्यावर स्टंप आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर दुसरीकडे या भ्याड हल्ला प्रकरणाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यभर पसरली. संपूर्ण दिवसभर राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलने झालीत.
आंदोलनाची भूमी समजल्या जाणाऱ्या वणीतही मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचे वरील भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्याचे आदेशावरून, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचे नेतृत्वात लालफुलिया परिसरातील राज्य महामार्गावरची मुख्य वाहतूक बंद पाडत, टायर पेटवित, संदीप देशपांडे यांचे वरील भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवित, तीव्र संताप व्यक्त केल्या गेला.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचे वरील भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत संपूर्ण राज्यभर आंदोलने होत असतानाच, वणीच्या भूमीत देखील असेच काहीसे आंदोलन होईल. अशी माहिती पोलिस प्रशासनाला असतानाही, मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना गुंगारा देत, शहरामध्ये येणारा मुख्य राज्य महामार्ग गाठला आणि संपूर्ण वाहतूक बंद पाडीत, रस्त्यावरती टायर पेटवीत, भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा. भ्याड हल्ल्याचा निषेध असो, अशा गगनभेदी घोषणा देत मनसे आंदोलकांनी बराच काळ वाहतूक रोखून धरली होती. शेवटी पोलिसांनी घटनास्थळ गाठत, वणी तालुका मनसे अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, वणी शहराध्यक्ष मनसे शिवराज पेचे, मोहम्मद इरफान सिद्दीकी,आजित शेख ,शहर उपाध्यक्ष गितेश वैद्य, बंडू बोंडे, वैभव पुरानकर, रणजीत पिंगे, लोकेश लडके, आकाश काकडे, अमोल जेऊरकर, अराफत खान, अक्षय मोहूर्ले, यांच्यासह पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी बराच काळ वणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आम्ही सोडणार नाही… राज साहेबांचा सच्चा शिलेदार, मनसेची बुलंद तोफ, आमचे नेते, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला खपवून घेणार नाही. आणि आम्ही त्यांना सोडणार देखील नाही. हा मनसेचा छावा आहे, बिळात लपून बसणार नाही. राजू उंबरकर राज्य उपाध्यक्ष,मनसे |
” नेमकी घटना काय “ मनसे नेते संदीप देशपांडे हे नेहमीप्रमाणे तीन मार्चला शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला गेलेले असताना, चार अज्ञात हल्लेखोरांनी जे तोंडावर मास्क लावून आले होते त्यांनी स्टम्पने अचानक देशपांडेंवर हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडेंच्या हात आणि पायाला दुखापत झाली. हल्लोखोरांना देशपांडेंना गंभीर दुखापत पोहचवायची होती. मात्र, सुदैवाने देशपांडे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले नाही. संदीप देशपांडेंवर हल्ला होताच येथील अनेक नागरिक त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले. त्यामुळे चारही हल्लेखोरांनी लागलीच येथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार हे चारही हल्लेखोर सध्या फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. |