🔸भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ, वणीत पेटली मशाल…
🔸 काँग्रेस नेते डॉ. महेंद्र लोढा यांचे नेतृत्वात निघाली भव्य मशाल रॅली…
🔸 धगधगती मशाल, तरुणाईचा सहभाग आणी गगणभेदी घोषणांनी वेधले वणीकरांचे लक्ष…
वणी : राजू निमसटकर
देश तोडू पाहत असलेल्या धर्मांध शक्तीच्या विरोधात राहुल गांधींनी वज्रमुठ बांधली आणि ज्या पेरंबुदूरच्या रस्त्यावर वडिलांच्या देहाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या आणि रक्ताचा सडा पडला होता, त्याच रस्त्यावर पुन्हा एकदा अतूट विश्वास टाकत, वडिलांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन विचाराचा वसा सोबत घेत दक्षिणेतल्या कन्याकुमारीपासून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली.
दक्षिण ते उत्तर म्हणजेच कन्याकुमारी ते काश्मीर असी तब्बल 3 हजार 570 किलोमीटर अंतराची भारत जोडो पदयात्रा, देशाच्या 12 राज्यासह 2 केंद्रशासित प्रदेशातून मार्गक्रमण करणार आहे. दर दिवसाला किमान 22 ते 23 किलोमीटरची पदयात्रा करीत 150 दिवस चालणाऱ्या या भारत जोडो यात्रेची सुरुवात 7 सप्टेंबर 2022 रोजी झाली. अगदी मोजक्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सुरू झालेल्या या पदयात्रेत आता लाखोंचा जनसमुदाय राहुल गांधी यांचे सोबत एकवटतो आहे. अनेक राज्यांना पालथे घालत,18 दिवसाचे मुक्कामात महाराष्ट्र राज्याच्या भूमीत आगमन झालेली ही भारत जोडो यात्रा, राज्याच्या 15 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदारसंघातून जाणार आहेत.
संपूर्ण देश महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचाराबरोबरच जाती-जातीत द्वेष पसरविणाऱ्या धर्मांध शक्तीच्या वणव्यात पेटतो आहे.
संपूर्ण जगात आदराने बघितल्या जाणार देशाचे संविधान आणि लोकशाही धर्मांध शक्ती संपवु पहाते आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा निर्माण झालेला देश तोडू पाहत आहे. याच देश विघातक शक्तीचा बिमोड करण्यासाठी मणसा-माणसाची तुटलेली मने जोडण्यासाठी, काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून, ठिकठिकाणी भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ, पदयात्रा-मोटर सायकल मार्च तर कुठे मशाल रॅलीचे आयोजन केल्या जात आहे.
खा. राहुल गांधी यांच्या याच भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते डॉ. महेंद्र लोढा यांनी पेटती मशाल हाती घेत वणीच्या भूमीत भव्य मशाल रॅलीचे आयोजन केले होते. आयोजित मशाल रॅलीमध्ये माजी जि प सदस्य आशिष खुलसंगे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ईजहार शेख, काँग्रेस नेते संजय खाडे, मालेकरसर, ऍड अरविंद सिडाम, राजाभाऊ बिलोरिया, प्रमोद वासेकर, काँग्रेस युवा नेते प्रमोद निकुरे, मारेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, युवा नेता अंकुश माफुर, पुरुषोत्तम आवारी, जिल्हा महिला अध्यक्षा वंदना आवारी, महिला काँग्रेस नेत्या साधनाताई गोहकार, वणी शहर अध्यक्ष सविता ठेपाले, महिला नेत्या नीलिमा काळे, मंगलाताई झीलपे, विजयाताई आगबत्तलवार, वणी तालुका कॉग्रेस महिलाध्यक्ष वंदना धगडी, सामाजिक कार्यकर्ते सत्तारभाई यांचेसह अनेक काँग्रेस नेतृत्वांची मशाल रॅलीमध्ये उपस्थिती होती.
मशाल रॅलीतील प्रत्येकाच्या हाती असलेली धगधगती मशाल, तरुणाईचा सहभाग आणी गगणभेदी घोषणांनी वणीकरांचे लक्ष वेधले होते. आयोजन भव्य मशाल रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यासह अनेक समविचारी युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
एकूणच काय तर,
आयोजित मशाल रॅलीच्या निमित्ताने…“उषःकाल होता होता काळरात्र झाली.
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…”हे कविवर्य सुरेश भटांचे अजरामर काव्य आठवल्या शिवाय राहित नाही. हे विशेष…