- सतरा वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी घेतली होती, यवतमाळ जिल्ह्याचे जळका गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट
- सततची नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर, मुलीच्या लग्नाची आणि शिक्षणाची चिंता सतावत असलेल्या परशुरामने २००५ साली केली होती आत्महत्या
वणी:- राजू निमसटकर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीमुळे आयुष्य बदलेलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदूरकर या शेतकरी महिलेस तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या भेटीचा योग आला आहे. ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होऊन राहुल गांधी यांची एकदा तरी भेट व्हावी, अशी इच्छा कलावती यांची होती आणी ती आता काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रयत्नाने पूर्ण होत आहे.
देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असताना राहुल गांधी २००५ मध्ये विदर्भ दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या भेटी घेतल्या. मारेगाव तालुक्याच्या जळका येथील कलावती बांदुरकर या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची देखील त्यांनी भेट घेतली होती. कलावती बांदुरकर यांचे पती परसूराम यांनी २००५ मध्ये सततची नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर, मुलीच्या लग्नाची आणि शिक्षणाची सतावत असलेल्या चिंतेने आत्महत्या केली होती. कलावती व त्यांच्या कुटुंबीयांची हि अवस्था बघून आणि व्यथा ऐकून व्यथित झालेल्या राहुल गांधी यांनी कलावती व त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत केली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या त्या भेटीने कलावती बांदूरकर अचानक प्रकाश झोतात आल्या होत्या. यादरम्यान त्यांना देश, विदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला. राज्य शासनानेही कलावती बांदुरकर यांना विशेष महत्त्व देत सर्व योजना त्यांच्या दारापर्यंत पोहचविल्या. त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला. राहुल यांच्या भेटीमुळे कलावती बांदुरकर यांचे जीवनच पालटून गेले होते, हे विशेष.
राहुल गांधी मुळे आमचे दारिद्र्य दूर झाल्याची भावना कलावती आजही बोलून दाखवितात. म्हणूनच राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’ निमित्ताने विदर्भात येत असल्याने त्यांची एकदा भेट घेण्याची इच्छा कलावती यांची आहे.
हाच नेमका धागा पकडत राज्यातील एकमेव काँग्रेसचे खासदार असलेले चंद्रपूर-वणी-आर्णि लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी कलावती बांदुरकर यांची मारेगाव येथे भेट घेतली. आणी भारत जोडो यात्रेच्या निमित्याने १४ नोव्हेंबरला वाशीम येथे येत असलेल्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची भेट घडवुन आनण्याचा विश्वास व्यक्त केला. यासाठी स्वतः खासदार बाळूभाऊ धानोरकर हे कलावती बांदुरकर यांना सोबत घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसमवेत उद्या वाशिमला निघणार आहेत.
कलावती बांदुरकर यांच्या भेटीदरम्यान खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे समवेत तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष मारोती गौरकार, मारेगाव शहराध्यक्ष शंकरराव मडावी, नितीन खडसे, अंकुश माफूर, धनंजय आसुटकर, समीर सय्यद, गब्बर शेख यांचे सह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.