“वसंत” ची निवडणूक ठरली,
विधानसभेची रंगीत तालीम…
प्रतिष्ठा पणाला, वाढली धाकधुक…

वणी : राजू निमसटकर
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या, दि वसंत को-ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड वणीची निवडणूक संपली आणि प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नेतृत्वाची धाकधूक वाढली. ही निवडणूक जणूकाही वणी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीमच होती की काय, असेच सर्वत्र वातावरण संपूर्ण वणी विधानसभा मतदार संघात बघावयास मिळाले.

वणी मारेगाव झरी जामणी या तालुक्यामध्ये विभाजित असलेल्या वसंत जिनिंगमध्ये दहा हजार नऊशे चौतीस असे एकूण सभासद आहेत. याच सभासदांमधून सात हजार तीनशे अठरा सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून त्यांना सतरा संचालक निवडून द्यावयाचे आहे. यासाठी एकूण त्रेसष्ठ उमेदवार निवडणूक मैदानात आपले भवितव्य पणाला लावून आहेत.

एकोणविसशे चौसष्ट साली निर्माण झालेल्या या वसंत जिनिंगच्या निवडणुकीचे इतिहासात, झालेल्या या निवडणुकीत कधी नव्हे अशी चुरस संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला बघावयास मिळाली आहे. परस्पर विरोधी चार पॅनल मध्ये झालेली चुरशीची लढत बघता, आजी माजी आमदारांसह वणी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण राजकीय नेतृत्वाची पत, पणाला लागली असून आता मतमोजणी होईस्तोवर ती पेटी बंद झाली आहे.
असे झाले, केंद्रनिहाय मतदान…
“विजय” च उधळणार विजयाचा धुराळा…
विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम ठरलेल्या वसंत जिनिंगच्या निवडणुकीत, वणी विधानसभा क्षेत्रातील आजी-माजी आमदारांसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेतृत्वांची पत पणाला लागली असून परस्पर विरोधी चार पॅनलने निवडणुकीला रंगत आणली होती. मात्र, अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीच्या विजयाचा धुराळा “विजय” च उधळणार अशी चर्चा सर्वत्रिक होती…






