अखेर, कॉंग्रेसच ठरलं…!
आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्याच काँग्रेसच्या उमेदवार.


● शहकाटशहाच्या राजकारणात आ. प्रतिभा धानोरकरांनी मारली बाजी
● भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर उभ ठाकलं तगड आव्हान.
● शिमग्याच्या सप्तरंगात इंडिया – एनडीए असा रंगेल थेट सामना.

एकीकडे शिमग्याच्या रंगात, सप्तरंगांचा उडालेला धुराळा आणि दुसरीकडे शहकाटशहाच्या राजकारणात बाजी मारत, आमदार प्रतिभाताई धानोरकरांनी मिळवीलेल्या उमेदवारीने राजकारणाच्या पटलावर उडविलेला राजकीय धुराळाच म्हणावा लागेल. यामुळे मात्र इंडिया विरुद्ध एनडीए असा थेट सामना मतदारसंघात रंगणार असून एका नारी शक्तीने शिमग्याच्या सप्तरंगात वनमंत्राच्या वनराईला दिलेल्या तगड्या आव्हानामुळे निवडणुकीचा राजकीय धुराळा तितकाच रंगतदार ठरेल यात शंका नाही.

संपूर्ण देशभर 2019 ला “मोदी” लाट असतानाही शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकरांनी ऐनवेळी उमेदवारी मिळवित चार टर्म भाजपच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा रोवला होता. राज्याच्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसला फक्त चंद्रपूर लोकसभाच जिंकण्यात यश मिळालं होतं. त्यामुळे चंद्रपूर-वणी-आर्णी हा लोकसभा मतदारसंघ उमेदवारीपासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत चांगलाच चर्चेत राहिला होता. तोच किस्सा यावेळी देखील मतदार संघातील जनतेला बघावयास मिळताना दिसत आहे. महायुतीने भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे तर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर करीत राजकीय धुराळा उडवून दिला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच म्हणजे इंडिया विरुद्ध एनडीए अशीच थेट लढत पुन्हा एकदा मतदार संघातील जनतेला बघावयास मिळणार आहे.

दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर काँग्रेसचा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचा उमेदवार कोण असणार यामध्ये पक्षातच चढाओढ सुरू झाली होती. सहानुभूतीच्या नव्हे तर नैसर्गिक न्यायाप्रमाणे आणि मतदारसंघातील प्रत्यक्ष जनसंपर्काचा आधार असलेल्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा उमेदवारीसाठी कंबर कसली होती. तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे देखील युवा महिला नेत्या शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी मैदानात उतरले होते. काँग्रेस नेते तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दबाव तंत्राचा वापर करीत उमेदवारीसाठी कमालीची स्पर्धा निर्माण केली होती. उमेदवारीचा हा प्रवास मुंबईपासून दिल्लीपर्यंत तो थेट काँग्रेस हायकमांड पर्यंत पोहोचला होता. चढाओढीच्या आणि शहकाटशहाच्या राजकारणाचा प्रसार माध्यमांचे माध्यमातून तिथेही रंग बघायला मिळाला होता. कधी प्रतिभा धानोरकर तर कधी शिवानी वडेट्टीवार अशा चढाओढीचे द्वंद्व युद्ध बघावयास मिळत असतानाच, खुद्द विजय वडेट्टीवारांच्या नावावर काँग्रेस हायकमांड शिक्कामोर्तब करणार, अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी झळकविल्या देखील होत्या. शेवटी दिल्लीत हायकमांड जवळ ठाण मांडून बसलेल्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी एक हाती किल्ला लढवित चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी पक्की करीत “नारी शक्ती सबपे भारी” म्हणत उमेदवारी नाट्यावर पडदा पाडला. एकूणच काय तर चढाओढीच्या आणी शहकाटशहाच्या राजकीय मैदानात आमदार प्रतिभाताई धानोरकरांनी सुरुवातीलाच बाजी मारल्याने 2019 च्या निवडणुकीचा तोच राजकीय ज्वर आणी तीच रंगत पुन्हा एकदा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील जनतेला बघावयास मिळणार का, हे पाहणे तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपाच्या पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झालेले राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुंनगटीवार यांचा नामांकन अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाचे म्हणजेच महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर मुंनगटीवार हे चंद्रपूर लोकसभेसाठी २६ मार्च रोजी नामांकन अर्ज भरणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टीसह मित्र पक्षाचे मोठमोठे नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याचे कळते. याबरोबरच, अगदी अटीतटीच्या द्वंद्व युद्धात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसची उमेदवारी खेचून आणण्यात यशस्वी झालेल्या आमदार प्रतिभाताई धानोरकरांचे कार्यकर्त्यांनी जल्लोष स्वागत केले. यावेळी संघर्षाशिवाय यश पदरात पडत नाही असे म्हणत, आमदार प्रतिभाताई धानोरकरांनी कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले व येत्या 27 तारखेला मतदारसंघातील काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात उघड तर भाजपमध्ये छुपी गटबाजी पहावयास मिळते आहे. काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर समर्थक, अशी दुफळी निर्माण झाल्याचे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसते आहे. या संपूर्ण गोंधळात काँग्रेस पक्षातील गटबाजी उघडपणे समोर आली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी पतीच्या मृत्यूला पक्षातील काही नेतेच कारणीभूत असल्याचे वक्तव्य करून गटबाजीला खतपाणी घातले तर दुसरीकडे, वडेट्टीवार समर्थकांनी पत्रपरिषद घेत गटबाजीचे दर्शन घडविले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षात जितके नेते तितके गट, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
इकडे भाजप उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रसार माध्यमांचे माध्यमातून विकासाचा आणि विजयाचा चेहरा म्हणून सर्वत्र दिसत असले तरीही, सदैव सर्वांच्या संपर्कात राहणारे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहीर सध्या कुठे आहेत, असा प्रश्न कार्यकर्त्यांसह मतदारांना पडला आहे. याबाबत भाजप नेतृत्वांकडून सर्वकाही आलबेल असल्याचे बोलले जात असले तरीही, भाजपातली ही छुपी गटबाजी 2019 चा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचा निकाल बघता सर्वांच्या मुखी बोलकी आहे.
नाही म्हणता म्हणता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चंद्रपूर लोकसभेसाठी वनमंत्री मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर केली आणि भाजपा सह मित्र पक्षाच्या अनेक नेतृत्वाच्या पोटात दुखणे सुरू झाले. मुनगंटीवार यांच्या पहिल्याच आशीर्वाद सभेला हंसराज भैया अहीर गैरहजर होते. अहीर दिल्लीत होते, असे समर्थक सांगत असले तरीही भाजप नेते उघड गटबाजीचे दर्शन घडवत नसले तरी छुप्या पद्धतीने मत व मनभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसते आहे.


नमस्कार... 🙏 स्थानिक साप्ताहिकांपासून पत्रकारितेला सुरुवात ते थेट आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. केबल टीव्ही न्यूज चैनल ते आघाडीच्या "जय महाराष्ट्र" टीव्ही न्यूज चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल अर्ध्या दशकाहून अधिक काळ कार्य. आणी आता, मागील एक दशकापासुन आघाडीच्या "आवाज माझा" या वेबसाईटचे मुख्य संपादक व न्यूज पोर्टलचे माध्यमातून जनसामान्यांचा आवाज...🙏

Leave a Comment