● आशा कर्मचारी ( सिटू ) ● वणी शहर कार्यकारिणी जाहीर ● कविता कुबडे : अध्यक्ष – वणी शहर ● मेघा बांडे : सचिव – वणी शहर |
वणी : राजू निमसटकर
जनतेच्या आरोग्याचे महत्त्वपूर्ण माध्यम ठरलेल्या आशा कर्मचारी यांना मात्र आपल्या मानधन वाढविण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो. त्यातच विना वेतनावर कार्य करीत असताना त्यांना अनेकदा आरोग्य अधिकारी तसेच न.प. किंवा ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांचा सुद्धा रोष ओढवून घ्यावा लागतो. अशा बिकट परिस्थितीत काम करीत असताना शासनाकडून त्यांना मूठभर मानधन दिल्या जात असल्याने वारंवार संघर्ष करीत मार्गक्रमण करावे लागते. संघर्ष करीत असताना त्यांना संघटनेची गरज असते म्हणून देशपातळीवर त्यांच्या अधिकारासाठी संघर्ष करणारी सिटू कामगार संघटना यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत आहे. ह्या संघटनेचा जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे ह्या वणी येथे आशा कर्मचाऱ्यांचा समस्या जाणून घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानिमित्ताने वणी येथे आशा कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचा तालुका अध्यक्ष कॉ. प्रितीताई करमनकर होत्या तर माकपचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, जनवादी महिला संघटनेच्या कॉ. अनिताताई खूनकर व सरिता दानव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या बैठकीत कॉ.उषा मुरखे यांनी प्रत्येक आशा कर्मचारी यांची समस्या ऐकून घेतली. त्यावर त्यांनी त्यांना समस्या सोडविण्यासाठी संघटनेची एकता व मजबुती आवश्यक असल्याचे सांगत संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यांनी सध्या आशा व गट प्रवर्तकांचे राज्यव्यापी संपपुकारल्याने शेवटी राज्यसरकारला आशा कर्मचाऱ्यांचा मानधानमध्ये पाच हजार रुपयाची वाढ करावी लागली. हा संघटनेचा एकतेचा, मजबुतीचा व संघर्षाचा विजय असल्याचे सांगितले. यावेळेस कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी सिटू कामगार संघटना ही देशातील कामगारांची सर्वात मोठी संघटना असून कष्टकऱ्यांचा सर्वच विभागात कार्यरत असल्याने प्रत्येक कामगारांचा अन्यायाला तोंड देण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी सक्रिय असल्याचे सांगितले. कॉ. अनीताताई खूनकर यांनी अनेक कामगार संघटनांचे उदाहरण देत सांगितले की, अनेक संघटना ह्या दुकानदारी म्हणून चालवीत असून त्यातील नेते हे कामगारांचा वापर करीत आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. या वेळेस सरिता दानव यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.
यावेळेस वणी शहराची आशा कर्मचाऱ्यांची कार्यकारिणी तयार करण्यात आली असून ह्यामध्ये अध्यक्षपदी कविता कुबडे, उपाध्यक्षपदी योगिता कूनघाटकर तर सचिवपदी मेघा बांडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीला प्रामुख्याने सोनाली निमसटकर, शिला नळे, अश्विनी पोहेकर, गीता भालेराव, वर्षा गोवरदिपे, वंदना ठाकरे, प्रतिभा लांजेवार, कल्पना मजगवळी, शुभांगी नागपुरे, ताई डोंगरे, चंदा पथाडे, किरण बोंसुले,शुभांगी डोंगरे, माधुरी कामडे आदी व अन्य आशा कर्मचारी उपस्थित होत्या