▪️ सुधीर मुनगंटीवारांसमोर कडवे आव्हान ▪️ काँग्रेसचा उमेदवार ठरणार निर्णायक ▪️ प्रतिभा धानोरकर की शिवानी वडेट्टीवार |
वणी : राजू निमसटकर
चंद्रपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यात विभागलेला आणि सहा विधानसभा मतदार संघात व्यापलेला “चंद्रपूर-वणी-आर्णी ” हा लोकसभा मतदारसंघ राज्याच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर नाव असलेला लोकसभा मतदारसंघ आहे. भौगोलिक क्षेत्रफळाने अत्यंत मोठा असलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या चंद्रपूर जिल्ह्यामधील ४ व यवतमाळ जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विधानसभेच्या या ६ मतदारसंघांपैकी वणी, बल्लारपूर आणि आर्णी हे तीनही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून या विधानसभा मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व आहे. तर राजुरा आणि वरोरा मतदारसंघावर काँग्रेसचे प्रतिनिधित्व असून चंद्रपूर विधानसभा मतदार संघ अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या ताब्यात आहे. होवू घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचा उमेदवार म्हणून भाजपकडून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना, नाही म्हणता म्हणता पक्ष नेतृत्वाने उमेदवारी बहाल केली आहे. तर कांग्रेस कडून दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. येणाऱ्या काही तासात या जागेवर कांग्रेसचा उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होईलच. मात्र, मागील वेळेप्रमाणे याही वेळेला काँग्रेसची उमेदवारी ही निर्णायक ठरेल का ? याविषयी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात घमासान चर्चा आहे.
एकीकडे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चढता राजकीय प्रवास बघता, भाजपाच्या शिर्ष नेतृत्वाने आपल्या हक्काचा माणूस म्हणून २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील याच लोकसभा मतदारसंघाच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मुसद्दी आणि चाणक्य राजकारणी म्हणून ओळखले जाणारे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचा भाजपाचा उमेदवार म्हणून लोकसभेच्या निवडणूक मैदानात उतरविले आहे.
तर दुसरीकडे, काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्यात नव्याने राजकीय समीकरणांची मांडणी होतं आहे. कुणबी बहूल समाज सर्वाधिक संख्येत असलेल्या याच मतदारसंघात कुणबी समाजाला एकदाही खासदार पद न मिळाल्याचा मुद्दा मागील लोकसभा निवडणुकीत जसा केंद्रस्थानी होता. तसा तो याही वेळेला कायम आहेच. त्यामुळे टोकदार झालेली जातीय अस्मिता, गाठीशी असलेली काँग्रेसची परंपरागत मते, सोबतीला दलित आणि मुस्लिम समुदायाची हक्काची व्होट बँक आणि भाजप मधून झालेली छुपी मदत, यामुळे २०१९ च्या मोदी लाटेतही दिवंगत खासदार बाळू धानोरकर निवडून आले होते. त्यावेळी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले होते. विशेष म्हणजे संपूर्ण राज्यभरातील अनेक ठिकाणच्या जागावर वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांच्यामुळे माळी समाजाच्या मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन झालं आणि भाजपची हक्काची मते आणि लोकसभेची जागा २०१९ ला भाजपाच्या हातून गेली, हे बोलक सत्य कुणी नाकारण्याच कारण नाही. यावेळी तर संपूर्ण देशात इंडिया आघाडीने वज्रमुठ बांधली आहे. त्याचा प्रत्यय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबई येथील समारोपीय भव्य सभेच्या निमित्ताने नुकताच प्रत्येकाला आला. आणि राज्यातील महाविकास आघाडीमध्ये असलेल्या समन्वयाची ताकद देखील सर्वांना बघायला मिळाली. त्यामुळे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उमेदवारीला अधिक बळ प्राप्त होईल असे सध्या तरी वाटते आहे.
भाजपाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे उमेदवार म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरविले आहे. त्याचं तगडं आव्हान पेलण्यास कोण समर्थ आहे, केवळ सहानुभूतीचा विचार न करता विजयाचाचं विचार करीत त्यासाठी लागणारा साम-दाम-दंड-भेद आणि सोबतीला सूक्ष्म नियोजनाचा आराखडा आखणारा प्रचंड इच्छाशक्तीला सोबत घेऊन सोशल इंजीनिअरिंग च्या माध्यमातून विरोधकांना चितपट करीत विजयाचा मार्ग सुकर करणारा उमेदवार गरजेचा आहे, याचा विचार देखील पक्षश्रेष्ठींनी करणे गरजेचे आहे. अशी एक विचारधारा संपूर्ण मतदारसंघांतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बोलली जात आहे. त्याबरोबरच
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जे राजकीय समीकरण चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात बनले होते, ती राजकीय परिस्थिती आजची नाही. अशीही एक विचारधारा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. संघटितपणे लढणाऱ्या कांग्रेसमध्ये आज दुफळी आहे आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षातील नेत्यावर आरोप लावून पतीच्या मृत्यू बाबत जो गौप्यस्फ़ोट केलायं, ही बाब त्याला आणखी बळ देत असून कांग्रेसमध्ये अंतर्गत शीतयुद्ध असल्याचे स्पष्ट संकेत दिसते आहे. त्यामुळे अर्थातच लोकसभा निवडणुकीत बाजी मारायची असेल तर, बलाढ्य असणाऱ्या भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर सर्व शक्तिनीशी ताकदीने उभा राहणारा व राजकीय आखाड्यात शेवटच्या क्षणापर्यंत टिकणारा उमेदवार कांग्रेसला यावेळी द्यावा लागेल, एवढे मात्र खरे.